Gardening, My Hobby
- Harshad Deshpande
- May 15, 2018
- 3 min read
‘जागा आणि वेळ एवढे दोनच शत्रू सोडले तर सगळे सगळे आयुष्य निसर्गासाठीच’ हे आजच्या शहरी पिढीचे ब्रीद वाक्य मलाही लागू आहे.
वाड्यात रहात असताना पडवीत कर्दळ, घोसाळी, पपई, विड्याचा वेल, कोरफड अशी झाडे झुडपे लावली होती.
लहानपणापासून जात्याच फळाफुलांची व झाडांची आवड असल्यामुळे Brown Leaf (वाळलेला पालापाचोळा) या गटाचा सदस्य आनंदाने बनलो.
या व्हॉट्सप गटाचे उपयोग आणि काही उपयोगी कडक पाळली जाणारी त्याची नियमवली व फायदे.
१. ज्याच्याकडे जास्त आहे त्याने द्यावे, ज्याला हवे आहे त्याने घ्यावे.
२. पैशाचे नाव नाही, पण आपोआपच पिकवलेल्या भाजांची देवाण घेवाण चालते.
३. शुभप्रभात, शुभरात्री, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इकडचे उचलून तिकडे चिकटवणे या गटात मान्य नाही.
४. तज्ञांना आलेले अनुभव व त्यांचा योग्य वेळी योग्य सल्ला.
५. रोज पहात असून अनेक झाडा-झुडपांची मराठी इंग्रजी माहीत नसलेली नावे.
६. रोगांचे अचूक निदान आणि त्यावरचे रामबाण पण रसायन मुक्त उपाय.
७. जिवामृत बनवण्याची प्रक्रिया, वापराची मात्रा व वेळापत्रक.
८. पाचोळ्याचा, घरच्या ओल्या कचऱ्याचा अनेक सभासदांनी योग्य पद्धतीने केलेला निपटारा.
एका वर्षात जवळपास ५०० पोती पाला पाचोळा जागा मिळेल तिथे मी जिरवला.
आमच्या घरी कचऱ्याच्या बादलीचा आकार १० लि. वरून १ लि. वर आला. आजकाल दिवसाआड कचरा टाकला तरी चालतो. घरी तयार होणारे निर्माल्य, सोसायटीतला आणि पंचक्रोशीतून गोळा केलेला पालापाचोळा, निवडलेल्या भाज्यांची देठ, फळांची सालं हे सर्व कुंडीत किंवा कंपोस्टच्या २० लि. च्या डब्यात जाते. ३-४ वेळा या सगळ्याचे उत्तम खत मिळाले आहे. घरी बनलेले खत हे उत्तम आहे ही अनुभूती केवळ लावलेल्या रोपांना आलेल्या फळा, फुलांमुळेच.

आमच्या सोसायटीमध्ये एक मोकळा प्लॉट आहे. ती जागा सदोदीत ओसाड पडलेली असायची. त्याच्या भिंतींवर अनेक वेल लावले आहेत. सोसायटीतले निवृत्त झालेले २ काका मला या कामात खुप मदत करतात किंवा मीच त्यांना मदत करतो असे म्हणणे बहूदा बरोबर होईल. रोज पाणि घालणे, सोसायटीतल्या माळ्याकडून सर्व झाडांची निगा राखणे, गांडूळ प्रकल्पातील मिळणारे खत रोपांना देणे, शेतकी महाविद्यालयातून अथवा संभाजीबागेतील महानगर पालीकेच्या उद्यान विभागातून नवनवीन रोपे आणणे व ती लावणे ई. कामे ते नेमाने पार पाडतात.
सोसायटीच्या बाहेर एक भाजी विक्रेता आहे, त्याच्याकडील वाया गेलेल्या भाज्या आठवड्यातून एकदा मी जमिनीत टाकतो. बरिचशी फळ झाडे, मिरच्यांची रोपे आपोआप उगवतात. बाकिच्या भाज्या गांडूळ आणि इतर जमिनीतील सुक्ष घटकांना मेजवानी आणि मला उत्तम खत देतात.
सोसायटी अथवा बाहेरील जागेत लावलेल्या झाडांचे फळे फुले मिळण्याचे प्रमाण हे घरच्या पेक्षा कमी असते. बहुदा खारु ताई, कावळे, चिमण्या काही प्रमाणात सकाळ-संध्याकाळ व्यायामानिमीत्त चालणारी मंडळी ताव मारत असावीत. पण खंत कुणाला आहे, निसर्गाचे आपणही देणे लागतोच की.
आमच्या घराचे नुतनीकरण करताना, वाया गेलेले दरवाजे मी कुंड्या ठेवायला वापरतो. विटांची एक चळत दाराच्या दोन बाजूंना आणि एका बाजुला बाल्कनीचा कठडा असे दार आडवे पाडून त्यावर जवळपास १५-१६ मोठ्या कुंड्य़ा ठेवल्या आहेत.
ऑफिस मध्यल्या उपहारगृहातल्या उकळून टाकलेल्या चहा पावडरीचा पण मला खूप चांगला अनुभव आला. एकदा २० किलोची बादली रोज थोडी अशी साठवण करून भरून नेली व त्याचा एक थर जमिनीवर पसरला. एका महिन्यात सगळे गडपं.
या सर्व उपद्व्यापाला वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यामुळे आजपर्यंत मी लावलेली झाडे अथवा रोपे...
वांग, पावटा, तुर, मटार, गाजर, लाल भोपळा, मिरची, कांदे, लसूण, आलं, हळद, काकडी, कढीपत्ता, कडूनिंब, लिंबू, टोमॅटो, पपई, शेवगा, केळी, चवळई, मायाळू, नारळ, फणस, मोगरा, जास्वंद, चाफा, विड्याचा वेल, वाळा, बुच, आळू, बेल, चिंच, वावळ ई. अर्थात अजून नारळ, फणस, लिंबाला फळे आली नाहीत, पण त्यांची वाढ पाहता लवकरच तो योग आहे असे वाटतय.
प्रयोग म्हणून एक वडाचे बोन्साय पण केले आहे. त्याचा आकार सांभाळताना थोडी कसरत होतेय पण न सांगता बाग बघणारे नवीन लोक पण "हे बोन्सायका?" असे जेव्हा विचारतात तेव्हा योग्य मार्ग आहे हे जाणवते.
कुठल्याही प्रकारचे बी मिळाले की मी ते जपून ठेवतो. पावसाळ्याच्या आधी त्या बीयांपासून रोपे बनवतो आणि योग्यवेळी जागा मिळाल्यावर तिथे ते झाड लावतो. एवढेच कशाला या प्रयोगाच्या यशामुळे एकदा मी सफरचंदांच्या २ बीया रुजवता येतात का? असाही प्रयोग केला, त्याचेही उत्तर होकारात आले, पण ती रोपं जगवता आली नाहीत.
भावी पिढीचे भविष्य अवघड आहे... या आणि अशा चर्चांपेक्षा त्यांचे भविष्य उज्जवल आहे, हे आपण आपल्या कृतीतून, रामसेतू साठी खारीने उचललेल्या वाट्यासारखे दाखवून देऊ शकतो.
- हर्षद देशपांडे
Comentarios